कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे अवघड होत असून आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अनेक रुग्ण उपचाराअभावी रुग्णालयाबाहेरच प्राण सोडत आहेत, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीनेच अनेक रुग्णांची इम्युनिटी पाॅवर कमी होऊन मृत्यू होत आहे.
राज्यातील व जिल्ह्यातील ही कोरोना रुग्णांची स्थिती बघता चिमूर तालुक्यातील मॉडेल ग्रामपंचायत असलेल्या शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच वारजूकर यांनी शंकरपूर येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात येणार आहेत. यामुळे शंकरपूर ग्रामपंचायत ही कोरोना युद्धात नागरिकांसाठी ढाल बनणार आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. शंकरपूर येथेच कोविडचा उपचार व्हावा, याकरिता या केंद्रात ऑक्सिजन कन्सेन्ट्रेटर, ड्युअल फ्लो तीन नग, हुमीडिफायर हे साहित्य राहणार आहेत. या केंद्रात सहा रुग्णांना पुरेल एवढा ऑक्सिजन, सोबत व्हेंटिलेटरचे बेड या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे साहित्य खरेदी करण्याचे आदेश ग्रामपंचायतने संबंधित एजन्सीला दिले असून हे सर्व साहित्य आठ ते दहा दिवसांत येणार आहे. गंभीर रुग्णांना विशेष उपचारासाठी जाता यावे, यासाठी शंकरपूर ग्रामपंचायतने जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निधीतून सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिका खरेदी केली असून ती लवकरच रुग्णसेवेत दाखल होणार आहे.
कोट
चिमूर तालुक्यातील कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व बेडअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अनेक रुग्ण भीतीने इम्युनिटी पाॅवर कमी होऊन दगावत आहेत. ही भीती दूर व्हावी व गावातील रुग्णांना गावातच उपचार व्हावे म्हणून पंधरावा वित्त आयोग, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने हे केंद्र रुग्णांच्या सेवेत उभारण्यात आले.
- साईश वारजूकर,
सरपंच, ग्रामपंचायत, शंकरपूर