चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शाळा बंद होत्या. मध्यंतरी ५ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, त्यातही विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्पच होती. दरम्यान, आता आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याचा जिल्ह्यातील तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. मात्र, जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन किंवा ऑफलाईन जुळलेलेच नव्हते. त्यांचे मात्र भविष्यात शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकटाने तोंड वर काढले. दरम्यान, परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. कोरोना संकट वाढतच गेल्याने चालू शैक्षणिक वर्षातही प्राथमिकच्या तर शाळाच भरल्या नाही. दरम्यान, पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या. त्यापूर्वी ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. दोन महिने विद्यार्थी शाळेत जात नाही तोच पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. आता तर आठव्या वर्गापर्यंच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासक्रमात सहभागी होऊ शकले नाही त्यांना लाभ होणार आहे. मात्र, एकूणच विद्यार्थ्याकडे बघितल्यास मागील वर्गाचा अभ्यास न करताच पुढील वर्गात प्रवेश दिल्यामुळे पुढील वर्गातील अभ्यास या विद्यार्थ्यांना झेपेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मात्र, कोरोना संकटामुळे शासनाकडेही पर्याय नसल्याने हा निर्णयही योग्यच म्हणावा लागेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील विद्यार्थी
वर्ग विद्यार्थी संख्या
पहिली २८८२४
दुसरी ३१२७२
तिसरी ३१७८४
चौथी ३३७१९
पाचवी ३२८४५
सहावी ३२३५७
सातवी ३३१६१
आठवी ३३४४१
बाॅक्स
शिक्षकतज्ज्ञ म्हणतात,...
कोरोना रुग्ण संख्या बघता हा निर्णय योग्य वाटतो. तसेही आरटीई अंतर्गत आठव्या वर्गापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बघता ते भरून काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-जे. डी. पोटे
शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर
कोट
विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने संकतील मूल्यमापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे सरसकट पास केल्यास अन्य विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. शासनाने निर्णय जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना वर्गन्नोती करताना गुण कसे देणार यावर स्पष्ट दिशानिर्देश देणे आवश्यक आहे.
-प्रकाश चुनारकर
शिक्षक, चंद्रपूर
---
इयत्ता पहिली ते आठवीला वरच्या वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय अपेक्षितच होता. तसेही नापासचे धोरण नसल्याने या निर्णयाने फारसा फरक पडणार नाही. इयत्ता १ ते ४ सुरूच न झाल्याने त्यांचा पुढच्या सत्रात दोन्ही वर्षाचा पाठ्यक्रम भरून काढावा लागेल, इयत्ता ५ ते ८ चे विद्यार्थी मिळालेल्या वेळेत बऱ्यापैकी शिक्षण प्रवाहात ठेवता आले.
-हरीश ससनकर
शिक्षक, पोंभूर्ण