बल्लारपूर : भांडे, बांबूच्या टोपल्या तद्वतच टाकाऊ वस्तूंपासून श्रीगणेशाची अजबगजब मूर्ती बनविण्याची नवी लाटच काही वर्षांपूर्वी आली होती, ती गेल्या काही वर्षांपासून ओसरू लागली. कोरोना काळापासून ती बंद झाल्याचे दिसत आहे.
गणराज, गणपती बाप्पा हे हिंदूंचे आराध्य दैवत. पवित्रता, सोज्वळता यांचे मनोहारी प्रतीक. यामुळे त्यांचे रूप त्यांची मूर्ती आकर्षक आणि त्यांच्या गुणांप्रमाणे साधी लोभस स्नेहभाव असणारी असावी. गणेशोत्सव सुरू करणारे लोकमान्य टिळक यांनी घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात मंडपात बाप्पाची सोज्वळ रूपात मातीने तयार झालेली मूर्ती बसविण्याचे ठरवले आणि अनुयायी व गणेशभक्तांना तसे सांगितले. प्रारंभी गणेश मंडळ तसे वागलेही. मात्र, पुढे त्यात बदल होऊ लागला. मूर्तीचे रूप बदलत गेले. मातीच्या जागी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनू लागल्या. त्यांना वेगवेगळे रूप देण्यात येऊ लागले आणि पुढे तर भांडे, टोपल्या इतकेच नव्हे, तर टाकाऊ वस्तूंपासून अजबगजब दिसणाऱ्या मूर्ती आकारण्यात येऊ लागल्या. त्यांचे फोटो पेपरमध्ये झळकू लागल्यामुळे हे लोण सर्वत्र पसरू लागले. कोण या प्रकारच्या विविध वस्तूंपासून अजबगजब मूर्ती बनवू शकतो, याबाबत एक प्रकारची स्पर्धाच लागली. सोबतच विविध फळे, भाजी, नारळ-सुपारी, धान्य यापासूनही मूर्तींना रूप देण्यात आले. हा प्रकार गेली काही वर्षांपासून सुरू होता. कोरोना काळात गणेशोत्सवात गर्दी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक नियम लागले आणि गेल्या दोन वर्षांपासून तो प्रकार बंद झाल्याचे दिसत दिसून येत आहे. लोक बघायला येणार नाहीत, त्यामुळे तशा मूर्ती बनविण्यात अर्थ नसल्याचे बघून तो प्रकार बंद झाला असावा.