साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : नोकरी मिळत नाही, असे म्हणत कसेबसे आयुष्याचे दिवस ढकलणारे बरेच जण समाजात आहेत. यासाठी आजची सरकारी धोरणेही तितकीच जबाबदार आहेत. मात्र, खिन्न मनाने नोकरीच्या प्रतीक्षेत जगण्यापेक्षा स्वयंरोजगाराचा मार्ग 'स्वीकारणारे तरूण-तरूणी त्या क्षेत्रातही पाय रोवू शकतात. पिपरी (देश) येथील अनुप सुधाकर खुटेमाटे या इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या तरुणाने सिद्ध केले आहे.
पिपरी हे गाव छोटेसे. पण दूध उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. अनुप खुटेमाटे याने जिल्हा परिषद शाळेत सातवी व ८ ते १० जिल्हा परिषद शाळा भद्रावती आणि ११ ते १२ वी शिक्षण मातोश्री विद्यालय चंद्रपूर तर २०१७ मध्ये इंजिनिअरची पदवी 'नागपुरातील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राप्त केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी दिल्ली गाठली. तीन वर्षे अभ्यास केला. कोरोनामुळे २०१९ मध्ये घरी परतावे लागले.
कोरोनाने धडा शिकवला
दिल्ली येथून घरी परत आल्यानंतर काय करावे, हा प्रश्न उभा ठाकला. त्यानंतर नैसर्गिक दूध डेअरी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस केल्याचे अनुप सांगतो. आता त्यात यशही मिळू लागले. यासाठी आई-वडिलांसोबत चर्चा करून डॉ. चेतन खुटेमाटे यांनी मार्गदर्शन घेतले. भाऊ संदीप खुटेमाटे, अमोल क्षीरसागर, पीयूष खुटेमाटे यांनीही व्यव- सायासाठी मोठे सहकार्य केले. व्यवसायात अडचणी आल्यास त्यावर मात कशी करायची याचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले.
दररोज ३०० लिटर दूध विक्री
दररोज गावातून ३०० लिटर शेतकऱ्यांकडून दूध घेऊन चंद्रपूरला आणतो. यातून अनुपने सात जणांना रोजगार दिला आहे. दुधापासून दही, तूप, पनीर, खवा तयार करून अगदी माफक दरात ग्राहकांना पुरवितो. कोरोना लॉकडाऊन काळात अनुपची वाटचाल बदलली. नोकरी न करता त्याने आता व्यवसायातच पाय रोवणे सुरु केले, इलेक्ट्रिकल इंजिनिअर ते दुधवाला हा प्रवास खडतर असल्याचेही अनुपने सांगितले.