सावली :तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सावली येथील महसूल विभाग, पोलीस विभाग व नगरपंचायत विभाग ॲक्शन मोडवर आले असून कारणाविना व विनामास्क फिरणाऱ्यांची अँटिजन तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत ९० नागरिकांची कोरोना चाचणी केली असून यात सहा जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट दिल्याने या काळात अलोट गर्दी होत आहे; मात्र त्यानंतरही विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाणही अधिक असल्याने शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत ९० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सहा कोरोनाबाधित आढळून आले. त्यांना उपचारासाठी सावली येथील कोविड सेंटरला पाठविण्यात आले आहे.