सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा गट ग्रामपंचायतच्या वतीने लखमापूर येथे रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्त्याचे माती काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सूचनेनुसार संपूर्ण मजुरांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
मागील तीन महिन्यापासून कोविड अंतर्गत कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब लक्षात घेऊन सरपंच देवेंद्र गेडाम यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गट ग्रामपंचायतमध्ये येत असलेल्या लखमापूर या गावात पांदण रस्त्याच्या माती कामाला सुरुवात केली. तहसीलदार यांच्या सूचनेचे पालन करून माती कामाला सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण मजुराची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. तेव्हाच मजुरांना कामावर घेण्यात आले. याप्रसंगी सरपंच देवेंद्र गेडाम, तलाठी कांबळे, रोजगार सेवक युवराज डेकरवार आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.