वढोली : कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जगाला कोरोनाचा सामना करावा लागत आहे. या महामारीमध्ये लाखो लोकांना प्राण गमवावा लागत आहे. अशातच संपूर्ण भारतामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. त्याच अनुषंगाने मंगळवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे लसीकरणाचे आयोजन केले असल्याचे गावात दवंडी देऊन सांगण्यात आले. मात्र ढिसाळ नियोजनामुळे केंद्रात लसच उपलब्ध झाल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
४५ वर्षांवरील नागरिकांनी आधारकार्ड तसेच मोबाईल नंबर सोबत घेऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत विठ्ठलवाडा तर्फे करण्यात आले. नागरिकांनी या लसीकरणाला प्रतिसाद देत लस महोत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले. आपल्या गावात लसीकरण होणार असल्याने विठ्ठलवाडा येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु २० एप्रिल रोजी नागरिक जिल्हा परिषद शाळेत लस टोचण्याकरिता गेले असता आज लसीकरण होणार नाही असे विठ्ठलवाडा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याद्वारे सांगण्यात आल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले. अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परतावे लागले.