शंकरपूर येथील वैद्यकीय सेवा देणारे डॉ. अविनाश माणिकराव ढोक (वय ५४) यांचे मंगळवारी कोरोनामुळे चंद्रपूर येथे निधन झाले.
शंकरपूर येथे ते वैद्यकीय सेवा देत होते. या कोरोना काळात ते आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्ण तपासणी करून बऱ्याच लोकांना आधार देत होते. २४ तासांत केव्हाही रुग्णाने त्यांचा दरवाजा ठोठावला, तेव्हा ते रुग्णाला तात्काळ उपचार करीत होते.
डॉ. अविनाश माणिकराव ढोक हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून, राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती पद भूषविले आहे. शंकरपूर येथे विरोधी गटाचे पॅनेल त्यांच्याच नेतृत्वाखाली लढत होते. ते आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवर सदस्य असून, त्या पक्षात कार्यरत होते. त्यांनी शेवटपर्यंत वैद्यकीय सेवा सुरू ठेवली होती. परंतु जशी त्यांची प्रकृती खालावत गेली, तशी त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली होती. त्यात ते पाझिटिव्ह आले होते. तेव्हापासून ते घरीच विलगीकरणात होते. सोमवारी सायंकाळी अचानकपणे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. परंतु मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली आणि आणखी एक कोरोना योद्धा कोरोनाने हिरावून घेतला.