कोरपना : कोरपना व जिवती तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. आजच्या आठवडी बाजारात सोशल डिस्टंसिंग दूरच पण ग्राहक व विक्रेत्यांनी तोंडाला मास्कही न लावल्याने आठवडी बाजारच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
मास न लावणाऱ्यांमध्ये लहान मुलांचीही संख्या अधिक आहे.
लोकमततर्फे आज ऑन दी स्पॉट स्पेशल मोहीम राबवून कोरोना काळातील गडचांदूर येथील आठवडी बाजाराची सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे कोरोना योद्धा म्हणून आरोग्य विभागात काम करणारे अनेक कर्मचारी सुद्धा बाजारात विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये कोरोनाची भीती उरली नसल्याचे हे स्पष्ट चित्र होते. केवळ १५ टक्के लोकांनी मास्कचा वापर केला असल्याचे दिसून आले.
तहसीलदार व ठाणेदारांकडून झाडा-झडती
मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना कोरोनाच्या बाबतीत दक्ष राहण्यासंदर्भात आपल्या आवाहनातून स्पष्ट सूचना दिल्या असल्याने अधिकारी जागृत झाले आहे. तहसिलदार महेंद्र वाकलेकर व ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वातील पथकाने मंगळवारी सकाळी आठवडी बाजारामध्ये फिरून सर्व विक्रेत्यांना मास्क व सॅनिटायझर वापरण्यासंदर्भात सूचना केल्या. मात्र सायंकाळी आठवडी बाजारामध्ये सर्व ग्राहक व विक्रेत्यांनी सूचना पायदळी तुडवल्या गेल्याने कोरोना वाढल्यात 'मी जबाबदार' म्हणण्याची पाळी प्रत्येक नागरिकांवर येणार आहे हे मात्र निश्चित.