अजय गुल्हाणे
: ‘माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी’ संवाद सभेचे मूल येथे आयोजन
मूल : कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये, यासाठी जास्तीत जास्त रूग्णांची कोरोना तपासणी केली जात आहे. यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे. आस्थापन धारकांनी आपल्या आस्थापनेत कार्यरत कर्मचाऱ्यांना तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखूनच आपले काम करावे, ‘माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत आपले कार्यक्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे मत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी व्यक्त केले.
तालुका प्रशासन आणि नगरपालिका मूलच्या वतीने येथील कन्नमवार सभागृहात आयोजित माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी या संवाद सभा दरम्यान ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले, मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, मूलचे तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी, पोंभूर्णाचे तहसीलदार डाॅ. निलेश खलके, मूलचे पोलीस निरीक्षक सतिषसिंह राजपूत, पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, मूल नगरपालिकेेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, ६० वर्षांवरील नागरिकांनी ॲपवर नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा. लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरविल्या जात आहे. मात्र नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. अतिशय सुरक्षितपणे लसीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अजल गुल्हाणे यांनी यावेळी केले.
संचालन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी केले. यावेळी मूल आणि पोंभूर्णा तालुक्यातील शेकडो लोकप्रतिनिधी उपस्थित होते.