चंद्रपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न सोहळा आयोजित करण्याचा बहुतांश कुटुंबीयांचा कल असतो. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा सोहळा अनेकांनी रद्द केला असून, लग्न तारीख पुढे ढकलली आहे. परिणामी शहरातील एकाही लाॅन, मंगलकार्यालयामध्ये या दिवशी लग्न नाही. त्यातच २५ जणांच्याच उपस्थित लग्न उरकायचेे असल्याने मुहूर्ताच्या भानगडीत न पडता काहीजण लग्न करीत आहे. त्यामुळे लाॅन संचालक, कॅटरर्स तसेच यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्न करण्यासाठी अनेकांची लगबग असायची. मंगल कार्यालय बुक करण्यासाठी मोठी धावपळ व्हायची. अनेकवेळा या दिवशीची तारीखही मिळत नव्हती. मात्र यावर्षी एकसुद्धा लग्न या मुहूर्तावर नसल्याचे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याचे लाॅन तसेच मंगल संचालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, दोन ते तीन महिन्यांपूर्वी या मुहूर्तावर अनेकांनी लग्नाची तारीख बुक केली. मात्र कोरोना संकटामुळे ॲडव्हान्स सुद्धा वापस करण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर पुढील जून तसेच जुलै महिन्यांपर्यंतही लग्न तारीख रद्द करण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.
यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेला विचारले असता, काटेकोर नियमांचे पालन करून काहींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातीलही अनेकांनी समारंभ रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
कोट
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या विवाह मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात धामधूम असायची. अनेकांना लग्न करण्यासाठी मंगल कार्यालय, लाॅनमध्ये तारीख सुद्धा मिळत नव्हती. यावर्षी मात्र एकही लग्न या मुहूर्तावर नाही. काहींनी दोन ते तीन महिन्यापूर्वीच या मुहूर्तावर बुकिंग केली. मात्र कोरोना संकटामुळे त्यांनी ॲडव्हान्स सुद्धा वापस घेतला आहे.
- विश्वास बल्की
संचालक, विश्वास कॅटरर्स तथा बिछायात केंद्र
बाॅक्स
आर्थिक उलाढालही थांबली
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यासह विविध शुभकार्याची सुरुवात व्हायची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे अनेकांनी लग्नकार्य तसेच अन्य कामाचा मुहूर्त पुढे ढकलला आहे. त्यामुळे कार्यक्रमच रद्द झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची मोठे नुकसान झाले असून, बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे.
बाॅक्स
२५ पाहुण्यांमध्ये कसे करणार लग्न
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. दरम्यान, २५ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुतांश कुटुंबीयांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे, तर काहींनी घरच्या घरीच लग्नकार्य उरकून टाकले आहे. परिणामी कॅटरर्स, लाॅन, मंगलकार्यालय, घोडे, बॅंड, आचारी डेकोरेशन, संगित, एवढेच नाही तर वाहनचालक-मालक, जनरेटर चालकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
बाॅक्स
बाजारपेठतही शांतता
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयेच्या दिवशी असतो. या दिवसापासून अनेकजण शुभकार्याला सुरुवात करतात. विशेषत: विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांची संख्या या दिवशी मोठी असते. या दिवसामध्ये बाजारपेठेत धामधूम असते. मात्र यावर्षी विवाह नाही की कोणते शुभकार्य नाही. त्यामुळे बाजारपेठेमध्ये स्मशानशांतता पसरली आहे.
बाॅक्स
नियमाचे पालन करून घरीच उरकले लग्न
कोरोनामुळे प्रशासनाची परवानगी घेऊन केवळ २५ पाहुण्यांच्या उपस्थित लग्न करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र काहींनी परवानगीच्या भानगडीत न पडता घरच्या घरीच लग्न उरकले आहे.