नगराध्यक्षांची निवडणूक : नंदा बावणे, गजानन जुमनाके, संजय झाडे बनले नगराध्यक्षकोरपना/जिवती/गोंडपिंपरी : कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. शुक्रवारी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यात कोरपना व जिवती येथे काँग्रेस पक्षाचे तर गोंडपिंपरी येथे भाजपाच्या उमेदवाराने बाजी मारत नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडली.१० जानेवारीला कोरपना, गोंडपिपरी व जिवती अशा ३ नव्याने स्थापीत नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. तिनही नगरपंचायतीत १७ सदस्य आहेत. कोरपना नगर पंचायतमध्ये काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेतकरी संघटना-१ व अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल होते. यात नगराध्यपदी काँग्रेसच्या नंदा विजय बावणे तर उपाध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मसूद अली यांची अविरोध निवड करण्यात आली. जिवती नगरपंचायतीत काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस ४ व भाजपा-३ असे पक्षीय बलाबल होते. शुक्रवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे गजानन गोदरू जुमनाके यांनी राष्ट्रवादीचे अमर राठोड यांचा १० विरुद्ध ७ असा पराभव करत सत्ता काबीज केली. तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे दत्ता राठोड विजयी झाले. त्यांनी भाजपच्या नगरसेविका राठोड यांचा १० विरुद्ध ७ ने पराभव केला. गोंडपिपरी नगरपंचायतीची पहिली निवडणूक बिनविरोध पार पडली. नगराध्यक्षपदी संजय झाडे तर उपाध्यक्षपदी चेतन गौर या भाजप उमेदवारांची अविरोध निवड झाली. येथे भाजपाचे सहा व अपक्षाचे सात असे समीकरण जुळविण्यात आले. नगराध्यपदासाठी भाजपकडून संजय झाडे यांनी तर शिवसेनेच्या शोभा संकुलवार यांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे तीन व काही अपक्ष नगरसेवकांना हाताशी घेत सत्तेसाठी शिवसेनेने खटाटोप केला. मात्र गणित न जुळल्याने गुरूवारी शोभा संकुलवार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे संजय झाडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी चेतन गौर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
कोरपना, जिवतीत काँग्रेस तर गोंडपिंपरीत भाजपची सत्ता
By admin | Published: January 30, 2016 1:08 AM