चंद्रपूर : शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून ताकीद देण्यात आली आहे. कडक अंमलबजावणी केली जात आहे. मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांच्या नेतृत्वातील पथकाने मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानात आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली.
शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू असून, मूर्ती घडविण्याचे काम सुरू आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी आहे. त्यात पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री करणे आदी बाबींचा समावेश आहे. या संदर्भात शहरातील सर्व मूर्तिकारांची बैठकही घेण्यात आली होती. या नियमांचे कडेकोट पालन व्हावे, या दृष्टीने पोलीस विभाग, मूर्तिकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षक यांचे संयुक्त पथक पाहणी करत आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठेही पीओपी मूर्ती विक्री, साठा व खरेदी करू नये, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके, मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे यांनी गणपती मूर्तीची पाहणी करून काही नमुने घेतले. गणपती मूर्ती पीओपीची आढळल्यास सक्त कारवाई केली जाणार आहे. अशी तपासणी शहरात ठिकठिकाणी केली जाणार आहे.