रेडियम लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळणरस्त्यांवर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सहयोगी संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
चंद्रपूर : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. महापलिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कारवाईची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. अन्न व औषधपुरवठा विभागाने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.