चंद्रपूर : शहरातील जटपुरा गेट, पठाणपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूंच्या नावासह वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे गुरुवारच्या महानगरपालिका आमसभेत हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.
महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल व सर्व नगरसेवक उपस्थित हाेते. चंद्रपुरातील वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आदेश आहे. शासकीय दस्तऐवजात नोंदी नसलेले आणि समाजामध्ये प्रचलित असलेल्या जातिवाचक नावाच्या ठिकाणी शासकीय दस्तऐवजाप्रमाणे नावाचे नामफलक लावावे, याबाबत कार्यवाही करण्याचे कळविले होते. नाव बदलवण्याबाबत सर्वच नगरसेवकांनी तीव्र विरोध केला.
अशा आहेत वस्त्या
जटपुरा, पठाणपुरा, माना टेकडी व बंगाली कॅम्प, शास्त्रीनगर प्रभाग, गोंड वस्ती, यादव वस्ती व उडिया वस्ती, इराणी मोहल्ला ही नावे जातिवाचक असल्याचा अहवाल दिला. मात्र, सर्व सदस्यांनी ठरावाला विरोध केल्याने नामंजूर झाला. हा ठराव राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध जाणारा असल्याने पुढे काय होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
आधी दरवाजे बंद करा
यापूर्वीच्या सभेत महापौरांनी दोन मिनिटांत अनेक ठराव पारीत करून सभागृहातून निघून गेल्या होत्या. विरोधी सदस्यांचे म्हणणेही एकले नाही. याकडे लक्ष वेधून असाच प्रकार घडू नये म्हणून सभागृहाचे दरवाजे बंद करा, अशी भूमिका काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका सुनीता लोढीया यांनी मांडली. त्यामुळे महापौर व लोढीया यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भानापेठ वार्डातील ५० लाखांचे टेंडर कोटेशन करून १० लाखांत देण्यात आला. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोपही नगरसेविका लोढीया यांनी केला.
'अमृत' नळयोजनेची पोलखोल
चंद्रपुरातील वादग्रस्त अमृत योजनेवरून सत्ताधारी भाजपचे नगरसेवक राहुल घोटेकर यांनीच आरसा दाखविला. पाण्याचा पत्ता नाही. मात्र, रस्ते फोडून ठेवल्याने नागरिक हैराण आहेत. घोटेकर यांनी बाटलमध्ये अमृतचे तथाकथित शुद्ध पाणी थेट सभागृहात आणून हे पिऊन दाखवा, असे आव्हान महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व अतिरिक्त आयुक्तांना केले. त्यावर, वाट पाहा १५ मिनिटांत शुद्ध येते, असा युक्तिवाद महापौरांनी केला.
सीएसटीपीएसला कर आकारणार
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचा आठवा वीज संच मनपाच्या हद्दीत येतो. करापोटी ४ कोटी ९१ लाख ६ हजार ७९२ रुपयांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा काँग्रेसच्या नगरसेवक नंदू नागरकर यांनी सातत्याने मांडला. सभेतही त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे यापुढे सीएसटीपीएसला कमर्शियल कर आकारण्यात ठराव मंजूर करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सर्वांचीच नाराजी
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी केंद्राने जाचक अटी व शर्थी लागू केल्या. अजूनही पात्र कुटुंब घरकुलापासून वंचित असल्याचा आरोप करून नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.