पाईप लाईनमध्ये लपविले बुच : पाणीपुरवठ्यात चंद्रपूरकरांची सुरू आहे दिशाभूलचंद्रपूर : काही ना काही गैरप्रकाराने सतत गाजत राहणाऱ्या चंद्रपुरातील उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेला नवा गैरप्रकार पुढे आला आहे. शहरातून पाणीपुरवठा करणाऱ्या तीन इंच व्यासाच्या पाईप लाईनमध्ये बूच टाकून व त्याला छोटे छिद्र पाडून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचा प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे.उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी महानगरपालिकेच्या नगरसेविका सकीना रशिद अन्सारी यांंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हा प्रकार पुराव्यासह पत्रकारांपुढे सादर केला.शहरातील पाणी पुरवठ्यासाठी सहा, ते तीन इंच व्यासाच्या भूमीगत पाईप लाईन टाकण्यात आल्या आहेत. या पाईपलाईनला जोड देताना त्यात बुच टाकण्यात येतो. त्या बुचाला दोन सेंटीमिटर व्यासाचे छिद्र करून पाईप जॉइंटने चिकटविला जातो. यामुळे शहरातील नळांना येणारे पाणी अधिक वेळपर्यंत तर राहते, मात्र पाण्याला जोरच (फोर्स) नसतो. नळ जास्त वेळ राहात नाही, अशी नागरिकांची तक्रार दडपण्यासाठी हा प्रकार सुरु आहे. परिणात: शहरातील अनेक भागात पाणीच पोहचत नाही. जमीनीवर असलेल्या नळांनाही पाणी येत नाही. त्यामुळे खोल खड्डे करावे लागत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणण्यात आली.शहरात पाणी पुरवठा योग्यपणे आणि मुबलक व्हावा यासाठी पाण्याच्या मोठ्या टाक्या तयार करण्यात आल्या असल्या तरी त्या कधीच पूर्ण भरल्या जात नसल्याचे यावेळी बापू अन्सारी यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, केवळ दोन तास टाक्या भरतात. त्या भरत असतानाच नळही सोडण्यात येतात. त्यामुळे नळांना फोर्स नसतो. टाकीत पाणी किती भरले हे लक्षात यावे यासाठी लाल रंगाची पट्टी टाक्यांवर असते. मात्र ती जाणीवपूर्वक वर ओढून अडकवून ठेवली जाते. त्यामुळे टाकीत पाणी भरपूर आहे, असे पहाणाऱ्यांना वाटते. प्रत्यक्षात टाक्या रिकाम्याच असतात. बालाजी वॉर्ड, अरविंदनगर यासह अनेक भागात नळाचे पाणीच पोहचत नाही, अशी तक्रार नगरसेविका विणा खनके यांनी यावेळी केली. त्या म्हणाल्या, आपल्या वॉर्डात आणि स्वत:च्या घरीसुद्धा गढूळ पाणी येते. कंपनीकडे तक्रार करूनही फायदा नाही. नागरिकांची तक्रार ही कंपनी मनावरच घेत नाही. सभागृहात या प्रकरणी प्रश्न उचलण्यात येवूनही कंत्राटदाराची मनमानी कमी झाली नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला महानगरपालिकेचे गटनेते प्रशांत दानव, बापू अन्सारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
उज्ज्वल कन्स्ट्रक्शनच्या झारीत भ्रष्टाचाराचा शुक्राचार्य
By admin | Published: July 07, 2015 1:08 AM