लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिकसह धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकेही घेतली जाते. मात्र, मागील पंधरवड्यापासून रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण केले. सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीनचे पीक पिवळे पडले असून, काही ठिकाणी सडून खराब होत आहे. कुठे पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी पिकांवर विविध प्रकारची रोगराई वाढत आहे. परिणामी, यंदा उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, या विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सूर्यनारायणाचे दर्शनही होत नसल्याची स्थिती आहे. सतत रिमझिम पावसामुळे कपाशी पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांनी जूनमध्ये खरीप हंगामाची पेरणी केली. काहींनी धूळपेरणी केली. मात्र, पावसाने दगा दिला. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली.
कापूस उत्पादक तालुकेजिल्ह्याची ओळख धान उत्पादक अशी असली तरी काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. यामध्ये राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापूस उत्पादन तर ब्रह्मपुरी, सावली, सिदेवाही, मूल, पोंभुर्णा, नागभीड, गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. दरम्यान, धान, आणि कापूस हे दोन्ही पीक काही तालुक्यांमध्ये घेतल्या जाते.
शेतकरी म्हणतात...."मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीवर रोगराई तसेच पिके पिवळी पडत आहे. त्यामुळे यावर्षी लावलेला खर्च निघणार की नाही, ही चिंता प्रत्येक शेतकऱ्याला आहे. शेतकरी पिकांची जोपासणा करण्यासाठी फवारणी करीत आहे. मात्र, पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनची हीच अवस्था आहे."- प्रमोद लांडे, शेतकरी, गोवरी
"सतत दोन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, संपूर्ण पीक पिवळे पडले आहे. संबंधितांनी पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी."- विजय धोटे, शेतकरी,