जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात जोमदार झाली. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस बरसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची अल्पावधीतच पेरणी केली. बुधवारपर्यंत जिल्ह्यात किती हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या, याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, गोंडपिपरी तालुक्यात दरवर्षी सोयाबीन व कापूस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदाही हजारो शेतकऱ्यांनी या दोन पिकांनाच प्राधान्य दिले. सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकवून टाकल्या. आता दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने अंकूर करपण्याच्या स्थितीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. बोअरवेल व विहिरींसारख्ये स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांचा कसाबसा सांभाळ केला, परंतु अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. येत्या तीन- चार दिवसांत पाऊस बरसला नाही, तर पहिल्या पेरणीतील पिके तग धरण्याची शक्यता नाही. अनेकांना दुबार पेरणी करण्यासाठी नवीन बियाणे विकत घेण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बोगस बियाण्यांनी केला घात
जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊ नये, यासाठी पथके गठीत केल्याचा दावा कृषी विभागाने केला, परंतु हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजुरा, गोंडपिपरी व कोरपना तालुक्यात बोगस बियाणे सहजपणे मिळत होते, अशी माहिती आहे. काही शेतकऱ्यांनी बोगस बियाणे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसावरचे अवलंबित्व, खतांची अनुपलब्धता, लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी पिकांचे पाडलेले भाव, पीककर्ज देण्यास बँकांकडून नकार आदी कारणांमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
धान उत्पादक शेतकरीही चिंतित
सोयाबीन व कापूस उत्पादकांपेक्षा धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रोवणीसाठी जादा पाण्याची गरज भासते. पऱ्हे टाकायला मध्यम पाऊस असला, तरी पुरेसा आहे, परंतु यंदा धान उत्पादक तालुक्यातच पावसाचे प्रमाण कमी आहे. रोवणीसाठी शेतकरी जमीन तयार करून ठेवण्यास सज्ज झाला. समाधानकारक पाऊसच नसल्याने मशागतीच्या कामांवर विलंब होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.