चंद्रपूर : १६ तारखेला होणार्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अचूक व नि:पक्षपातीपणे करा, अशा सूचना देतानाच मतमोजणीमध्ये हलगर्जीपणा अजिबात होऊ देऊ नका, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी मतमोजणी अधिकार्यांना दिले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित मतमोजणी अधिकार्यांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते.
निवडणूक निरीक्षक एस. के. दास, अप्पर जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते, उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ व सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतमोजणी कशी करावी, याचे प्रात्याक्षिक उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी उपस्थितांना करुन दाखविले.
मतमोजणीच्या एक तास अगोदर उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर स्टाँग रुम उघडण्यात येईल. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून प्रथम टपाल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या साधारणता २२ ते २५ फेर्या होतील.
मतमोजणीसाठी विविध उमेदवारांचे चार ते पाच हजार प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित राहणार असून त्यांची खात्री होईल, अशा पद्धतीने मतमोजणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आकड्याचे उच्चार स्पष्ट असावे तसेच प्रतिनिधेचे समाधान होईल, अशा पद्धतीने काम करावे असेही त्यांनी सांगितले.
मतमोजणीच्या दिवशी सकाळी ५ वाजता कर्मचारी सरमिसळ करण्यात येणार आहे. यानंतर कुठल्या कर्मचार्यांची कुठल्या विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी नियुक्ती झाली, हे कळणार आहे. सर्व अधिकारी कर्मचार्यांची राहण्याची व्यवस्था बुरडकर सभागृह व तलाठी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यांच्या जेवनाची व वाहनाचीसुद्धा व्यवस्था करण्यात आल्याचे दामोधर नान्हे यांनी सांगितले.
मतमोजणी केंद्रात अधिकारी कर्मचारी यांना मोबाईल फोन वापरण्यास आयोगाने मनाई केली असून उमेदवाराचे प्रतिनिधी यांनाही मोबाईल नेण्यास प्रतिबंध असणार आहे. मिडिया प्रतिनिधीसाठी स्वतंत्र मिडीया कक्ष उभारण्यात आला आहे. मतमोजणीची आकडेवारी मॅन्युअल व संगणकीय पद्धतीने नोंदविण्यात येणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी प्रियदर्शनी सभागृह व पोलीस कवायत मैदान या ठिकाणी डिस्प्लेबोर्ड व ध्वनीक्षेपणाची सुविधा करणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. दुसरीकडे जिल्हाभरात १६ तारखेबाबत उत्सुकता वाढत आहे. आतापर्यंंत निवडणुकीच्या थांबलेल्या चर्चा पुन्हा एकदा रंगात आल्या आहेत. कोण या दिवशी बाजी मारेल, याचेही गणित लावले जात आहे. (शहर प्रतिनिधी)