चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती, चिमूर, मूल, जिवती, कोरपना, राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ६१.५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, जिवती तालुक्यातील दोन ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या आहेत.
यावेळी थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोमवारी तालुकास्थळी मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी तहसील कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आज मतमोजणी
९२ ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. दरम्यान, सोमवारी मतमोजणी होणार आहे. यासाठी तालुका प्रशासनांनी तयारी केली आहे. या निवडणुकीची प्रचंड उत्सुकता असून थेट सरपंचाची निवडणूक होत असल्याने मोठी रंगत आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.
दोन ग्रामपंचायती बिनविरोध
जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यातील दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध पार पडली. यामध्ये जिवती तालुक्यातील पिटीगुटी नं. २ आणि चिमूर तालुक्यातील नवीन जामनी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
२८१ मतदान केंद्र
जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी २८१ मतदान केंद्र होती. यासाठी १ लाख १३ हजार ६९१ मतदार होते. दरम्यान, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६१.५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
बिबीत मतदान यंत्राची गती मंदावली
कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत बिबी येथे मतदान यंत्राची गती मंदावल्याची स्थिती होती. सायंकाळी ५:३० वाजल्यानंतरही जवळपास २०० मतदार रांगेत उभे होते. दरम्यान, बिबी येथे वॉर्ड क्र.२ मध्ये माजी सरपंच व उपसरपंच राहिलेले शेतकरी संघटनेचे संतोषकुमार पावडे व माजी उपसरपंच तसेच युवक काॅंग्रेसचे प्रा. आशिष देरकर या मामा-भाचाने एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.