जिवती : आंध्रप्रदेश- महाराष्ट्र सिमेवरील अतिसंवेदनशील असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये आंध्रप्रदेशच्या दूरध्वनी सेवेचे कवरेज असल्याने ग्राहकांना रोमिंगचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिमेलगत असलेल्या नागरिकांनी आता आंध्रप्रदेशातील सिमकार्ड खरेदी करण्याचा सपाटा सुरु केला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवकांच्या हातात मोबाईल आहे. त्यांना दूरध्वनी सेवेचे कवरेज पुरवणारी महाराष्ट्रातील यंत्रणा आंध्रप्रदेशापुढे कमकुवत ठरत आहे. महाराष्ट्रातील भारी, सोरोकासा, शंकरपठार, वणी (बु.) वणी (खु.) सेवादासनगर कोठा, परमडोली, लेंडीजाळा, शंकरलोधी, महाराजगुडा, लेंडीगुडा, पद्मावती, इंदिरानगर, मराईपाटण या गावांसह अनेक गावात आंध्रप्रदेशाचे कवरेज असल्याने महाराष्ट्राच्या सिमकार्ड धारकांना मोठ्या प्रमाणातत रोमिंगचा फटका सहन करावा लागत आहे. अतिसंवेदनशील असलेल्या तालुक्यातील रस्ते, वीज दूरध्वनी सेवा सुरळीत असणे आवश्यक आहे. मात्र जिवती तालुक्याची स्थिती वेगळीच आहे. गावात जाण्यास रस्ते नाही. वीज पुरवठा नियमित राहत नाही. तातडीने महत्वाची सेवा पुरवणारी यंत्रणाही नेहमी विस्कळीत राहते. असे असतानाही संबंधीत विभाग मात्र गप्प आहे. जिवती शेणगाव, टेकामांडवा, भारी आदी ठिकाणी दूरध्वनी सेवा पुरविण्यासाठी मोबाईल टॉवर उभारले आहे. पण त्या ठिकाणी काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याने छोट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी आल्या की दूरध्ववनी सेवा ठप्प पडते. १९८९ पर्यंत या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नक्षली कारवाया झाल्या. मराईपाटणच्या जंगलात सर्वात मोठा भुसुरुंग स्फोट नक्षल्यांनी घडवून आणला. गाव- खेड्यात वस्ती करुन वसलेल्या नागरिकांच्या समस्या अनेक आहेत. मात्र तातडीने संदेश पोहोचविणारी दूरध्वनी सेवा नियमित नसल्याने मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या गावावर घुमतेयं आंध्रप्रदेशचे कवरेज
By admin | Published: October 21, 2014 10:48 PM