चंद्रपूर मल्टिपर्पज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व मूल येथील दिशा फाउंडेशन अशा दोन संस्था आहेत. या दोन्ही संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे आहेत. या संस्थेद्वारे चंद्रपूर येथे दोन तर मूल येथे एक कॉन्व्हेंट सुरू आहे. या दोन्ही संस्थेतील अध्यक्षपद कायमस्वरूपी आपल्याकडे राखण्याकरिता संस्थेच्या संचालक मंडळाचे आजीवन सभासद असलेले नामदेव आसुटकर, मोहम्मद जाफर, शोभा टोंगे, अनुपमा धांडे, महादेव लांडे, किरण चेनावनी, लटारु बल्की, जैनुल शेख यांचे संस्थेतून नाव खारीज करण्याबद्दल खोटे ना हरकत प्रमाणपत्र तयार करण्यात आले. परस्पर संचालक मंडळाच्या यादीतून त्यांची नावे कपात करण्यात आली. त्यानंतर संस्थेची निवडणूक घेण्यात आली. यात केवळ आप्तस्वकीयांना निवडणुकीकरिता बोलावण्यात आले होते.
अशाप्रकारे दोन्ही संस्थेची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार नामदेव आसुटकर व इतर सभासदांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. यावरून दुर्गापूर पोलिसांनी अध्यक्ष भाऊराव झाडे, सचिव शैलेश झाडे, सुभाष झाडे रा. गणेश नगर तुकूम चंद्रपुर यांच्याविरुद्ध ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास येथील चंद्रपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच ठाणेदार स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर सहारे करीत आहेत.