चिमूर (चंद्रपूर) : लग्न झाल्यानंतर ‘मानाची पंगत’ सुरू असताना कॅटरर्समध्ये काम करणाऱ्यांनी कोणताही ‘स्वीट’ पदार्थ वाढला नाही. त्यामुळे वरपक्षाकडील पाहुणे व कॅटरर्समध्ये काम करणाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. यात वऱ्हाडींनी तिथे असलेल्या प्लॅस्टिक खुर्च्या, भांडे व इतर साहित्य फेकून मारल्याने दोन्ही पक्षांकडील काहीजण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
येथील मिलन लॉनमध्ये प्रदीप यशवंतराव जाधव यांच्या मुलीचे लग्न होते. याकरिता क्वाॅलिटी व अन्नपूर्णा कॅटरर्स चिमूर यांच्याकडे जेवणाची ऑर्डर दिली होती. सोमवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास वरपक्षाकडील मानाची पंगत सुरू असताना कॅटरर्सवाल्यांकडून ‘स्वीट’ न वाढल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यातून कॅटरर्समध्ये काम करणारे व वरपक्षाकडील पाहुण्यांमध्ये हाणामारी झाली.
या दिवशी चिमूर तालुक्यातील आमडी (बेगडे), रेंगाबोडी, सोनेगाव (वन) येथे ग्रामपंचायत निवडणूक असल्याने येथील पोलिस स्टेशनचे मनुष्यबळ निवडणूक कर्तव्यावर होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार मोहन धनोरे व पोलिस नाईक कैलास आलाम हे घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनोज गभने हे आले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. फिर्यादी गौरव देवीदास मोहीनकर (रा. चिमूर) यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये मौजा सेलू (जि. वर्धा) येथील एकूण सात जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.