तंटामुक्त गाव समित्यांना आर्थिक बळ द्यावे
नागभीड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावातील वातावरण विकासाभिमुख होऊ शकते. मात्र, या समित्यांमध्ये राजकारण शिरायला नको. कोरोनाच्या पार्श्वभूमीव अनेक गावातील तंटामुक्त गाव समित्यांनी चांगले कार्य केले. त्यामुळे गृह विभागाने या समित्यांना आर्थिक व कायदेशीर बळ देण्याची मागणी नागरिकांनी केली.
सहकारी संस्थांसमोर कर्ज वसुलीचा प्रश्न
वरोरा : सहकारी संस्था बँकांनी कर्ज वितरण केले. मात्र, कोरोनामुळे वसुलीवर अनिष्ट परिणाम झाला. वसुलीच होत नसल्याने सहकारी संस्थांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशावेळी सरकारकडून निधीची आवश्यकता आहे. राज्य सरकारने धोरण तयार करून आर्थिक पॅकेज देण्याची मागणी सहकारी संस्थांनी निवेदनातून केली आहे.
नागभीड-वडसा मार्गावर नियमांचे उल्लंघन
ब्रह्मपुरी : नागभीड ते वडसा मार्गावर दररोज शेकडो आॅटो चालतात. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांना कोेंबून नेण्याच्या घटना सतत वाढत आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने आॅटो चालकांची मनमानी वाढली. ब्रह्मपुरी येथून विविध कामांसाठी वडसा येथे जाणाºया नागरिकांची संख्या वाढली. परिवहन महामंडळाने या मार्गावर जादा बसेस सोडल्यास समस्या दूर होवू शकते.
दुर्गापूर-ऊर्जानगर मार्गावरगतिरोधक बनवा
चंद्रपूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बांधावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे
सिंदेवाही : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात. पण, वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. बºयाच कुटुंबांकडे सिलिंडर नाही. कोरोनामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या निधीत कपात करण्यात आला. परिणामी, सिलिंडर वाटपाची योजना सध्या थंडबस्त्यात आहे. वन विभागाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन जळाऊ लाकूड उपलब्ध करून देण्याची मागणी तालुक्यातील वन परिसरातील नागरिकांनी केली आहे.
स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी
कोरपना : तालुक्यामध्ये बेरोजगारांची संख्या वाढली आहे. हाताला काम नसल्याने अनेक बेरोजगार वाम मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे नोकरभरती बंदी झाली. यातूनही बेरोजगारांची संख्या पुन्हा वाढणार वाढणार आहे. अशा कठीण काळात परिसरातील उद्योगांनी स्थानिक बेरोजगार युवकांनाच कामे देण्याची मागणी तालुक्यातील सरपंचांनी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे केली आहे.