जिवती : निसर्गाच्या भरवशावर कोरडवाहु शेती करणाऱ्या पहाडावरील शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे संकटात सापडला आहे. पिके अंकुर काढण्यापूर्वीच उन्हाच्या चटक्याने करपू लागली आहेत. सावकारी कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरणारे शेतकरी यंदा तरी निसर्ग साथ देईल, अशी आशा बाळगून होते. मात्र अल्पवधीतच त्यांच्या स्वप्नाचा चुराडा केल्याने दुबार पेरणी तरी कशी करावी, अशा विवंचनेत पहाडावरील शेतकरी सापडला आहे.जिवती तालुका डोंगराळ व पहाडी भागात असल्याने संपूर्ण कोरडवाहु शेती आहे. जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढुन मौल्यवान पिकाची लागवड केली आहे. सुरूवातीच्या दमदार पावसामुळे शेतातील पिके हिरवीगार दिसत होती. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल, कर्जातून मुक्ती मिळणार व सुखाचे जीवन जगणार, अशी आशा मनात बाळगली होती. शेतातील हिरवीगार पिके पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. मात्र आठ दिवसांपासून परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने पिकाची वाढ थांबुन खडकाळे रानातील पिके करपली जात आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्याने त्यांचे चेहरे सुकले आहे. पेरणी करताना, सावकारी कर्ज, बँक कर्ज, उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांनी शेतीत खर्च केले. अशीच स्थिती कायम राहिल्यास खरीपाच्या पेरणीवर केलेला खर्च पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. परिसरात सिंचनाची कुठलीच सोय नाही. निसर्गाच्या भरवशावर शेतकरी कोरडवाहू शेती करतात. दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला अधिक मिळावा, सावकारी कर्ज, बँक कर्जातून मुक्त व्हावे यासाठी नगदी पिक म्हणून सर्वात जास्त कापूस पिकाची लागवड परिसरात झाली असून कापसाबरोबरच सोयाबीन, ज्वारी, तुर, मुंग, उडीद आदी पिकेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र शेतातील हिरव्यागार पिकात मन लावून काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न वर्षानुवर्षे भंगु लागले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी उन्हाची तिव्रता व शेतातील कोमेजलेली पिके पाहुन शेतकरी खचू लागला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे अंदाजपत्रक खरिप हंगामावरच अवलंबून असते. मुलांचे शिक्षण असो वा मुलां-मुलींचे लग्न, की सावकारी व बँक कर्ज हा खरीप हंगामावरच अवलंबून असतो. खरीप हंगामच हातातून गेला तर करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असुन एकुणच तालुक्यातील खरिप हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पहाडावरील पिके करपली
By admin | Published: July 09, 2015 12:56 AM