चंद्रपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी सातबारा असलेल्या शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे; मात्र सातबारा नसलेल्या राज्यातील हजारो आदिवासी व पारंपरिक वननिवासी वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योग्य माहितीच मिळत नसल्याने यंदाचा खरीप पीक विमा दिवास्वप्न ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात खरीप पीक विमा योजनेत समावेशासाठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा व इतर अनुषंगिक कागदपत्रांच्या आधारे सहभाग नोंदविला जातो. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना वनजमिनींचे वाटप झालेले असून, या जमिनींची नोंद वनखंड क्रमांकाच्या स्वरूपात आहे; परंतु अशा वनजमिनीबाबत सातबारा उतारे अजूनही जारी झाले नाहीत. परिणामी, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत वैयक्तिक वनहक्कधारक शेतकऱ्यांचे सातबारा उतारे निघत नाहीत. सातबाराच नसेल तर पीक विमा योजनेचा लाभ कसा घ्यायचा, असा प्रश्न आदिवासी व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला.
महसुली अभिलेखच नाही
पीक विमा योजनेंतर्गत सहभागासाठी शेतकऱ्यांना स्वतःचे नावे नमुना आठ अ आणि सातबारा महसूल-अभिलेख आवश्यक आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत वैयक्तिक वनहक्कधारकांची नावे सातबारा उताऱ्यात इतर हक्कामध्ये नोंदविण्यात येतात. त्यामुळे त्यांचे नावे स्वतंत्र आठ अ आणि सातबारा हे महसुली अभिलेख उपलब्ध होत नाहीत.
आदेश आला; पण तिढा सुटेना
वनहक्कधारक शेतकरी व सातबारा संगणकीकृत न झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनधारणा दस्तावेजांच्या मर्यादा लक्षात घेता योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच अधिनस्त तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून विमा हप्ता व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी निवड करावी. त्यानंतर शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव बँकेकडून संकलित करून तहसीलदारांकडून तपासून प्राप्त करून घ्यावेत, अशा सूचना सरकारने दिल्या. वैयक्तिक वनहक्कधारक पात्र शेतकऱ्यांची प्रमाणित यादी जिल्हास्तरावरून घ्यावी व त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून इच्छुक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करावे, असे निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आले; परंतु यासंदर्भात विमा कंपन्यांकडून सकारात्मक हालचाली दिसत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणत्याही अडचणी नाहीत. सातबारा नसलेल्या जिवती तालुक्यातील काही वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांनाही लाभ घेता यावा, यासाठी ऑफलाईन प्रक्रियेच्या सूचना दिल्या. त्यामुळे एक रुपयात पीक विमा मोहिमेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर