सोयाबीन क्षेत्र घटणार : वरोरा तालुका कृषी विभागाचा आराखडावरोरा : तूर, कापूस व सोयाबीन हे पीक रोखीचे समजले जातात. त्यामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून ही तीन पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. परंतु यावर्षी खरीप हंगामात वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र घटणार असून तूर व कापसाच्या पेऱ्यात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. सोयाबीन पीक कमी खर्चाचे व अल्पावधीत उत्पादन देणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाला प्राधान्य देत होते. सोयाबिन निघाल्यानंतर इतरही पीक या शेतात घेत होते. परंतु मागील काही वर्षात सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना धोका देणे सुरु केल्याने या हंगामात शेतकरी सोयाबीन पीक घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. वरोरा तालुक्यात खरीप हंगामात ६४ हजार ५०० हेक्टर मध्ये शेतकरी पिकाची लागवड करीत असतात. यात भात ३० हजार हेक्टर, सोयाबिन १२ हजार ५०० हेक्टर, कापूस ३९ हजार ५०० हेक्टर, तूर ९ हजार ५०० हेक्टर इतर पिके ७५० हेक्टर मध्ये घेतली जाते. या हंगामात कापूसाचे क्षेत्र २५०० हेक्टरने वाढला आहे तर सोयाबीनचा पेरा २५०० हेक्टरनी कमी तर तूर पिकाचा पेरा एक हजार हेक्टरने वाढ होणार आहे. यावर्षी भाताला ७५० क्विंटल, सोयाबीनला ९ हजार ३७५ क्विंटल, कापूस बियाणे २ लाख ६६ हजार पाकिटे, तूर २५० क्विंटल बियाणे लागणार आहे. खरीप हंगामात युरिया ५ हजार ५०० मेट्रिक टन, डीएपी २४०० मेट्रिक टन, एमओपी ६०० मेट्रीक टन, फॉस्फेट २००० मेट्रिक टन, १५.१५.१५ ४५० मेट्रिक टन खते लागणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)खते घेताना सावधान !मागील काही वर्षापासून गावागावांमध्ये जाऊन काही कंपन्या खताची विक्री करीत आहेत. सेंद्रिय खताच्या नावाखाली खताची विक्री केली जात आहे. त्यामध्ये गुणवत्तेचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची अनेकदा फसगत झाली. विक्री करणाऱ्या कंपन्या अॅक्टमध्ये बसत नसल्याने तक्रार होऊनही कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी.
खरिपात तूर, कापसाचे क्षेत्र वाढणार
By admin | Published: May 21, 2016 1:05 AM