दिलासा : दोन हजारावर शेतकऱ्यांना दिला लाभबल्लारपूर : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते व शेती उपयोगी साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी खासगी सावकाराचा उंबरठा गाठावा लागतो. यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याच्या अनुषंगाने तहसील प्रशासनाने पुढाकार घेत बल्लारपूर तालुक्यातील दोन हजार १९० शेतकऱ्यांना विविध बँकेमार्फत कर्ज प्रकरणे मंजूर केली. तब्बल १५ कोटी ४३ लाख १० हजार ७३२ रुपयांचे पिक कर्जाचे वाटप केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.येथील उपविभागीय कार्यालय तथा तहसील कार्यालयाच्या वतीने शनिवारी स्थानिक सभागृहात शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कल्पना निळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विकास अहीर, संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे, सहायक दुय्यम निबंधक सुनील नवघरे, नायब तहसीलदार एन.एम. काळे, पी.डी. वंजारी, सत्यभामा भाले यांची उपस्थिती होती.यावेळी कल्पना निळ म्हणाल्या, मागील दोन वर्षापासून पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले. यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाय योजना करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पिक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. यात सेवा सहकारी संस्थेचाही हातभार लागला आहे. मध्यवर्ती सहकारी बँकेचा यात मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार विकास अहीर, बी.बी. गजभे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संचालन अजय मेकलवार यांनी तर आभार नायब तहसीलदार काळे यांनी मानले. यावेळी मंडळ अधिकारी बोरीकर, तलाठी महादेव कन्नाके, चव्हाण यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)२२६ शेतकऱ्यांना ६२ लाखांची कर्जमंजुरीनागभीड : शेतकऱ्यांना सहजरीत्या कर्ज उपलब्ध व्हावे, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या पीक कर्ज शेतकरी मेळाव्यात २२६ शेतकऱ्यांना ६२ लाख २५ हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार येथील तहसील कार्यालयात या पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार पी.आर. गावंडे, ए.बी. धकीते, सहा. निबंधक वुईके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी तहसीलदार समीर माने यांनी उपस्थितांना संबोधित केले व या मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कोणीही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये हे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. यावेळी नागभीड तालुक्यातील एकूण २२६ शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या पीक कर्ज शेतकरी मेळाव्यात शेतकरी, बँकांचे व्यवस्थापक प्रामुख्याने उपस्थित होते.
बल्लारपूर तालुक्यात १५ कोटींचे पीक कर्ज वाटप
By admin | Published: June 20, 2016 12:34 AM