रस्ते व्यापले : विद्यार्थी मिळविण्यासाठी संस्था चालकांची धडपडबल्लारपूर : प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट, विद्यालय, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयटीआय आणि तत्सम शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी मिळविण्याकरिता जाहिरातींचा सपाटा लावला असून जाहिरातींची भरमार गाव, शहराच्या, महानगरांच्या मोक्याच्या ठिकाणांवर लावलेल्या मोठाल्या फलकातून आढळून येते. त्यातच खासगी शिकवणी घेणाऱ्या इन्स्टीट्यूटनी तर यात विक्रमच केला आहे. सर्वांहून मोठ्या आकारांचे त्यांचेच फलक सर्वत्र लावलेले दिसून येतात.गाव, शहर तद्वतच गावा-गावांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यावर त्या-त्या शाळा, महाविद्यालय आणि खासगी इंस्टिट्यूटच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोंनी सजलेल्या जाहिराती आता आम बात होऊन गेली आहे. त्याचेच अनुकरण आता शाळा-महाविद्यालय करू लागले आहेत. जाहिरात फलक लावणे ही आता गरज होऊन बसली आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालय यांना आपल्या संस्थेची ‘अशी’ जाहिरात करणे कमीपणाचे वाटायचे. मात्र, आता ते प्रतिष्ठेचे आणि गरजेचे झाले आहे. यामुळे सर्वत्र लहान मोठ्या शाळा व महाविद्यालयाच्या जाहिराती कुठेही रस्त्याला कडेला आढळून येतात. यात दरवर्षी वाढच होत आहे. काही शिक्षण संस्थांच्या जाहिराती बाराही महिने रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी झळकत असतात. तर अन्य संस्था परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आणि पुढील सत्राच्या प्रवेशा दरम्यान जाहीराती करतात. नगर परिषदांच्या शाळाही आता अशा या जाहिरात तंत्रात उतरल्या आहेत. पूर्वी शहरात-गावात, महानगरात चित्रपटांचे मोठाले बोर्ड, पोस्टर्स त्या चित्रपटाची जाहिरात म्हणून झळकायचे. गाव शहरात प्रवेश करताच सिनेमाचे पोस्टर नजरेत पडायच्या. आता, त्याची जागा शाळा, महाविद्यालय आणि खासगी शिकवणी केंद्राने घेतली आहे. मागील काही वर्षांत चित्रपट व्यवसाय याबाबत कितीतरी मागे पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शैक्षणिक संस्थांच्या जाहिरात फलकांची गर्दी
By admin | Published: June 13, 2016 2:29 AM