चंद्रपूर : कोरोनाची रुग्ण संख्या संख्या कमी झाल्याने प्रशासनाने काही अटी व शर्तीवर हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. असे असले तरी शहरातील काही हाॅटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन गर्दीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजवावे
चंद्रपूर : नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी शहरातील विविध रस्त्यांचे खोदकाम करून पाईपलाईन टाकली जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविले जात नसल्याने अपघाताची शक्यता आहे. आता निर्बंध हटल्याने काम करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
चंद्रपूर शहरात सीटीबस सुरू करावी
चंद्रपूर : चंद्रपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत आहे. मात्र त्या तुलनेत सुविधा नाही. दाताळा तसेच पडोलीपर्यंत जाण्यासाठी महापालिका प्रशासनाने सीटीबस सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे.
कचरा संकलकांना सुविधा पुरवावी
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक घराघरातून घंडीगाडीद्वारे कचरा संकलन केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून संकलकांना कोणत्याही सुविधा नसल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या संकलकांना सुविधा द्याव्या, अशी मागणी केली जात आहे.
लाॅन व्यावसायिकांना दिलासा
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने संचारबंदी शिथिल केली आहे. त्यामुळे काही अटी व शर्थीवर लग्नसमारंभाला, तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. त्यामुळे लॉन व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
शहरभर दिसत आहेत जनजागृती फलक
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरभर जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. यासोबत सामाजिक संघटनेच्या वतीनेसुद्धा फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे.
रस्त्यावरील ‘ती’ वृक्षे हटवावी
चंद्रपूर: येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच डांबरीकण केले जात आहे. मात्र क्लब ग्राऊंड परिसरामध्ये रस्त्याच्या अगदी मधातच मोठमोठे वृक्ष आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर वृक्ष हटवून रस्ता मोकळा करणे गरजेचे आहे.
शहरात बांधकामांना आला वेग
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन होते की, काय अशी अवस्था आहे. त्यामुळे बहुतांश व्यावसायिक हातातील बांधकाम पूर्ण करण्याकडे लागले आहे.
स्टेडियमची त्वरित दुरुस्ती करावी
चंद्रपूर : येथील जिल्हा स्टेडियमची दुरुस्ती केली जात आहे. मात्र काम संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. येथील काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. संचारबंदी हटविण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालयाला सुट्या असल्याने मुलांजवळ वेळ आहे. तसेच मागील अनेक महिन्यांपासून घराबाहेर पडू शकत नसल्याने ते बोर झाले आहेत. त्यामुळे स्टेडिअमची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी आहे.
माठ व्यावसायिकांचे मोठे नुकसान
चंद्रपूर : दरवषर्षी उन्हाळ्यात माठांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु, यंदा ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने माठ व्यावसायिकांनी तयार केलेला माल पडून आहे.
शहराजवळील शेती घेण्याकडे कल
चंदपूर : शासकीय तसेच इतर नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर बहुतांश नागरिक शहराजवळील शेती घेण्याकडे वळले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जमिनीचे भाव वाढले आहे.
बसस्थानकाचे काम प्रगतीवर
चंदपूर : येथील बसस्थानकाचे बांधकाम सध्या प्रगतिपथावर असून लवकरच बसस्थानक सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊनच्या काळात काम थंडावले होते.
डोळ्यांचे आजार वाढले
चंदपूर : कोरोना संकटामुळे ॲानलाइन कामांना वेग आला होता. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये अनेकांना डोळ्याचे आजार होण्याचे प्रमाण वाढले असून डाॅक्टरांकडे जात आहे.
लिंबाची मागणी वाढली
चंदपूर : लिंबांमध्ये व्हिटॅमिन सी जीवनसत्व राहत असून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे लिंबाची मागणी वाढली असून दुकाने सजली आहेत.