झरपट नदीपात्रात मुलांची गर्दी
चंद्रपूर : येथील झरपट नदीच्या पात्रामध्ये मोठ्या संख्येने परिसरातील छोटी मुले पोहण्यासाठी जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या नदीपात्रात पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था
वढोली : बोरगाव पुलाकडून निघणारा ताराचंद कोपूलवार ते विश्वनाथ चुदरी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदण रस्त्यावर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य व मोठे खड्डे तयार झाले असून ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. या समस्येकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन
घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, पोंभूर्णा-चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी
मूल : तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी आहे.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे, तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागते. मात्र, बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.