बल्लारपूर : ग्राहकांची दुकानावर एकाचवेळी गर्दी होऊ नये याकरिता दुकान उघडण्याची आणि बंद करण्याची ठराविक वेळ शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय ठरवून दिलेली आहे. दुकानदारांकडून त्यांचे पालन होत आहे. मात्र नेमके दुकान बंद होण्याच्या बेतातच ग्राहक दुकानावर येतात आणि गर्दी करतात. त्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत.
दुकान बंदची वेळ सकाळी ११, दुपारी २, सायंकाळी ४ ची असो, दर वेळेला असेच होत असल्याचे व्यापारी सांगतात. त्यामुळे सामान देताना आमची धांदल उडते. आणि ज्या उद्देशाने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेळ ठरवून दिली आहे, त्याचा फज्जा उडून गर्दी होते, अशी व्यापाराची तक्रार आहे. लोकांच्या सोयीकरिता तसेच दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी वेळ ठरवून दिली आहे. जेणेकरून ग्राहक मोकळे मोकळे होऊन यावे. पण, ग्राहक दुकान ४ वाजता बंद होणार आहे ना, असे म्हणत नेमके ४ वाजताच दुकानात येतात. बहुतेक सारे ग्राहक तसाच विचार करीत असल्याने दुकान बंद करण्याचे वेळेला दुकानावर गर्दी होते. यातून ग्राहकांच्या निष्काळजीपणा दिसून येतो. आणि अशा गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण मिळते. ग्राहकांनी याची काळजी घ्यावी असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आलेल्या ग्राहकांना परत पाठविणे ही शक्य होत नाही, असे याबाबत व्यापारी म्हणतात.