पर्यटकांना थांबविण्यासाठी पोलिसांची दमछाक
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या मुक्ताई हे स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. तरीपण पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून त्यात पर्यटकांना थांबविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुक्ताई हे विदर्भात धबधब्यासाठी प्रसिद्ध असून माना समाजाचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ५५ फुटावरून कोसळणारा धबधबा हिरवी वनराई हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. परंतु मागील वर्षीपासून कोरोना या रोगामुळे पर्यटन बंद करण्यात आले होते. यावर्षीही शासनाच्या आदेशानुसार हे पर्यटन केंद्र बंद करण्यात आलेला आहे. त्यानुसार मुक्ताई ट्रस्ट व पोलीस प्रशासनाने हे पर्यटन केंद्र बंद केलेले आहे. मुक्ताईला जाण्यासाठी एक डांबरी रस्ता आहे. हा डांबरीकरण रस्ता पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केला आहे. तसेच याठिकाणी दोन पोलिसांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे आतमध्ये कोणीच पर्यटक या रस्त्याने जाऊ शकत नाही. हीच संधी साधून गावातील पाच सहा मुलांनी नवीन धंदा सुरू केला आहे. पर्यटकांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेऊन पर्यटकांना शेत बांधाच्या रस्त्यांनी धबधब्याच्या ठिकाणी घेऊन जातात. हा रस्ता जंगलातून जात असल्याने वन्य प्राण्यांमुळे एखादी दुर्घटनाही होऊ शकते.
बॉक्स
सुटीच्या दिवशी उसळते गर्दी
सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. रविवारी जवळपास तीनशे पर्यटक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी शेत बांधाच्या रस्त्याने गेले होते. पोलिसांना ही माहिती होताच ते धबधब्याच्या ठिकाणी गेले. पोलिसांना बघताच पर्यटक सैरावैरा पळून गेले. काही पर्यटक तिथेच थांबले. त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. आधीच या जंगलामध्ये वाघ व इतर वन्यप्राणी असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट
मुक्ताई हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांनी येऊ नये. आडमार्गाने याठिकाणी पर्यटक गेल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल.
-विनोद जांभुळे, सहायक पोलीस निरीक्षक शंकरपूर.