पळसगाव (पिपर्डा) : महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) मोठ्या थाटामाटात सुरू केले. मात्र गेल्या वर्षभरापासून हे अभियान खासगीकरणाच्या नावाखाली गुंडाळण्याच्या प्रयत्नात असताना महिलांच्या आंदोलनामुळे हे अभियान सध्यातरी सुरू आहे. मात्र या अभियानात मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती म्हणजेच सीआरपी महिला १८ महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत.
त्या आजही आपले कार्य निरंतर करीत असूनसुद्धा त्यांना १८ महिन्यांपासून कोणतेही मानधन दिले गेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सणाचे दिवस आहेत. मात्र त्यांच्या हातात पैसा नाही. थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, यासाठी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना नुकतेच निवेदन दिले आहे. थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी या महिलांनी केली आहे.