चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे ८ आणि ९ क्रमाकांच्या ५०० मेगावॅट युनिट प्लांट महानगर पालिकेच्या हद्दीत येतात. त्यामुळे या शहराचा पायाभूत विकास व आरोग्यासाठी स्थानिक महानगर पालिकेला सुमारे १० कोटींचा सीएसआर निधी देण्याची मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत रविवारी निवेदनाद्वारे केली.
सीएसटीपीएसचे ८ व ९ क्रमांकाच्या संचातून ५०० मेगावॅट वीज उत्पादन केले जाते. हे दोन्ही संच महानगरपालिकेच्या हद्दीत येतात. प्लांटमुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सीएसटीपीएसकडून मनपाला कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही, असा आरोप नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांनी केला. सामाजिक दायित्व निधी मिळाल्यास शहरातील आरोग्य सुविधा वाढविणे, स्वच्छता, रस्ते बांधकाम, नाली बांधकाम, सभागृह उभारणे आणि विविध विकासाची कामे करतात येतात. त्यामुळे यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी नगरसेवक नागरकर यांनी केली.