फोटो: बैठकीप्रसंगी उपस्थित सदस्य.
चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुदेव सेवा मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील दारुबंदी कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित संकल्प गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बैठकीला नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सेवा मंडळाचे प्रचारक विजय चिताडे, धर्माजी खंगार, आण्याजी ढवस, डॉ. दयाराम नन्नावरे, अशोक संगीडवार, बबनराव मत्ते, बबनराव अलमुलवार, देवराव बोबडे, भास्कर इसनकर, वासुदेव घोडे, रामराव धारणे, बाबुराव ढवळे, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, वृषाली धर्मपुरीवार, संगीता खंगार, रेखा काकडे, नंदा पिंपळकर आदी विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील दारुबंदी अधिक मजबूत व्हावी यासाठी काय कृती करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. दारुमुक्त गाव निर्माण करण्यासाठी गावागावात शहरातील वाॅर्डावाॅर्डात महिला गट निर्माण करावे लागेल , असे मत नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी व्यक्त केले. डाॅ. दयाराम नन्नावरे यांनी दारुबंदी उठविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. ज्येष्ठ प्रचारक विजय चिताडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक संगीडवार आदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी विविध महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, गुरुदेव सेवा मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले. संचालन विजय चिताडे तर आभार डॉ. दयाराम नन्नावरे यांनी मानले.