रविना टंडन : पत्रकार परिषदेत व्यक्त केले मतचंद्रपूर : सध्याचा काळ भारतीय चित्रपटांसाठी सुवर्णकाळ असून भारताएवढ्या चित्रपटांची निर्मीती जगात होत नसल्याचे प्रतिपादन चित्रपट अभिनेत्री रविना टंडन हिने केले. एका कार्यक्रमाकरिता रविना शुक्रवारी चंद्रपुरात आली असता पत्रकार परिषदेत ती बोलत होती. पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देताना रविना म्हणाली, मला मराठी थोडेफार येते. मात्र मराठीवर माझे प्रेम आहे, सायंकाळी प्राईम टाईममध्ये चित्रपटगृहात मराठी चित्रपट दाखविण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून ती म्हणाली, आपण पंजाबी महाराष्ट्रीयन आहोत. अलीकडे एकाहून एक सरस मराठी चित्रपट निघत असून त्यांचे कथानकही सुंदर असते. आपले पती चित्रपटांचे वितरक आहेत. मराठी चित्रपटांसंदर्भातील विक्रीचा त्यांचा अनुभवही चांगला असल्याचे ती म्हणाली. अलीकडच्या नव्या पिढीतील चित्रपट कलावंतांबद्दल विचारले असता ती म्हणाली, आपल्या काळात वेगळी क्रेझ होती. माधुरी, जुही, आपण स्वत: एके काळी काम करत असताना कितीतरी वर्षे प्रेक्षकांच्या मनावर आम्ही अधिराज्य केले. मात्र अलिकडे नव्याने आलेले कलावंत पाच वर्षातच जुने होतात. कारण नव्याने येणारे कलावंत वाढले आहेत. यातही सिद्धार्थ आणि आलिया यांच्यामध्ये आपणास वेगळी चमक दिसते, असे ती म्हणाली.नव्या चित्रपटांच्या दर्जाविषयी बोलताना रविना म्हणाली, प्रत्येक जनरेनच्या आवडीनुसार चित्रपटांचा काळही बदलत असतो. त्या पिढीचा विचार करून चित्रपट आणि चित्रपटांचे संगित घडत असते. बदल अपरिहार्य असले तरी प्रेक्षकांच्या आवडी मात्र वेगवेगळ्या असतात. त्या देखील जपणे महत्वाचे असल्याचे मत तिने व्यक्त केले. रविनाची चंद्रपुरात येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. तिची एक झलक पहाण्यासाठी ती थांबलेल्या हॉटेलसमोर आणि कार्यक्रमस्थळीही चाहत्यांची तोबा गर्दी झाली होती. (जिल्हा प्रतिनिधी)कुटुंबवत्सल रविनाचित्रपट आणि शूटिंगच्या धबडग्यात रविना कुटुंबासाठीही वेळ काढते. आपली मुलगी पाचव्या वर्गात असून कालच आपण तिच्या शाळेत गेले होते, बराच वेळ शाळेमध्ये होते,असे ती म्हणाली. शाळेतील स्पर्धेमध्ये आपल्या मुलीला पुरस्कार मिळाला. प्रमाणपत्रही मिळाले. त्यामुळे चंद्रपुरातून परत गेल्यावर तिच्यासाठी एखादी गिफ्टही आपण देणार असल्याचे तिने सांगितले. आपले पती चित्रपट विक्रेते असल्याचीही माहिती तिने दिली. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत अलिकडे मराठी चित्रपट चांगला व्यवसाय देतात, असे गुपितही रविनाने एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सांगितले.
सध्या भारतीय चित्रपटांसाठी सुवर्णकाळ
By admin | Published: April 11, 2015 12:56 AM