राजेश माडुरवार
वढोली (चंद्रपूर) : कोण किती ध्येयवेडे असतात, त्याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही. पण समाजासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकून देणारे ध्येयवेडे दुर्मिळच. अशीच एक ध्येयवेडी तरुणी सध्या महाराष्ट्रात फिरत चंद्रपूर जिल्ह्यात आली. आश्चर्य म्हणजे, महिला सशक्तीकरणासाठी तिने ९,१६५ किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलवरून केला आहे.
केवळ महिला, युवतींमध्ये जनजागृती व महिला सशक्तीकरणासाठी ही ध्येयवेडी युवती एकेक राज्य पालथे घालत आहे. आशा मालविया (२४) असे या युवतीचे नाव असून, मध्य प्रदेश राज्यातील नटाराम गावची ता. खिलचीपूर, जि, राजगड येथील रहिवासी आहे. आशाने गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात तिने सायकलने प्रवास केला असून, आता ती महाराष्ट्रात सायकलने भ्रमंती करीत गोंडपिंपरीत आली असून, महिला सशक्तीकरणासाचा संदेश देत आहे.
''सायकल यात्री'' म्हणून सध्या तिची ओळख झाली आहे. पदवीधर शिक्षण घेतलेली ही उच्चशिक्षित तरुणी. घरची परिस्थिती हलाकीची. वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबात फक्त आई व बहिणीसोबत शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा दैनंदिन क्रम. पण सध्या देशात महिलांवर होत असलेले अत्याचार, महिलांवर होणारा अन्याय, युवतींपुढे असणाऱ्या समस्या असे अनेक प्रश्न तिला भेडसावत होते. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करून आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटणे व जनजागृती उद्देश ठेवून संवाद साधणे, परिस्थिती समजून घेणे मानसिकतेचा अभ्यास करणे आदी कामे ती करीत आहे. एकूण २८ राज्यात प्रवास करून १५ ऑगस्टला दिल्लीत ती आपल्या प्रवासाची सांगता करणार असल्याची माहिती तिनेच गोंडपिंपरीत सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली.
मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील !
आशा मालविया सांगते की, मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील असून, हा प्रवास माझा व्यक्तिगत आहे. कुठल्याही शासकीय किंवा संस्थेच्या वतीने निघाली नाही. कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून, लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत लोकच आर्थिक मदत करतात. महिला सन्मानाच्या बाता सर्वच करतात. मात्र उपदेश हा देण्या-घेण्यापुरताच राहिला आहे. अशावेळी कुणावर अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने महिला जागृतीचा लढा उभारला आहे, अशी ती म्हणते. यावेळी तिचे गोंडपिंपरीत ठाणेदार जीवन राजगुरू यांनी स्वागत करत संवाद साधला.