गोंडपिपरी (चंद्रपूर) : स्वातंत्र्य संग्रामात वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. चंद्रपुरात वृत्तपत्रांचा जन्म व्हायचा होता. स्वातंत्र्य चळवळीतील सेनानींनी सर्वसामान्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यासाठी सायक्लोस्टाईल बुलेटिन काढले. ब्रिटिशविरोधी मतप्रवाह निर्माण करणाऱ्या या बुलेटिनच्या शोधासाठी ब्रिटिशांनी गुप्तहेर लावलेत. मध्यरात्री वेष बदलवून कार्यकर्त्यांपर्यंत गुप्तपणे बुलेटिन पोहचविले जायचे. शेवटपर्यंत या बुलेटिनचा थांगपत्ता ब्रिटिशांना लागला नाही. या बुलेटिनचे आजही चंद्रपूरकरांना कुतूहल आहे.
ब्रिटिश साम्राज्याची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरात स्वातंत्र्य सेनानींनी आंदोलन छेळले. या आंदोलनाची धग चंद्रपूरपर्यंत येऊन पोहचली होती. ब्रिटिशांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके यांनी चांदाभुमीत ब्रिटिश विरोधी आवाज बुलंद केला. त्यानंतर अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले. स्वातंत्र्य संग्रामात वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामान्यजनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचे महत्तम कार्य वृत्तपत्रांनी केले. सन १९१० मध्ये चंद्रपुरात वृत्तपत्रांचा जन्म व्हायचा होता. दुसरीकडे व्हाइसराॅय याने प्रेस विरोधात फतवा काढून प्रकाशन स्वातंत्र्यावर गदा आणली होती. अश्या बिकट स्थितीत चंद्रपुरातील स्वातंत्र्य संग्रामातील घडामोडींची माहिती देण्यासाठी सायक्लोस्टाईल बुलेटिन सुरू करण्यात आले होते. या बुलेटिनचा माध्यमातून ब्रिटिश विरोधी मतप्रवाह निर्मिती केल्या जात होता. वेषांतर करून अतिशय गुप्तपणे हे बुलेटिन सर्वसामान्यांपर्यंत पोहचविले जायचे. चंद्रपुरातील वानर सेनेकडून या बुलेटिनची विक्री केली जात होती. या बुलेटीनची माहिती ब्रिटिशांना होताच बुलेटिन काढणाऱ्या सेनानींचा शोध घेण्यास ब्रिटिंशानी गुप्तहेर लावलेत. मात्र अखेरपर्यंत त्यांना याचा शोध लावता आला नाही. छगनलाल खंजाजी आणि उत्तमचंद पुगलिया या दोघांनी नंतरच्या काळात अश्याच प्रकारच्या बुलेटिनचा वापर केला. चंद्रपुरातील साहित्यिक तथा जेष्ठ पत्रकार डाॅ. अ. तु. काटकर यांनी ‘चंद्रपूर : स्वातंत्र्य संग्रामातील अधोरेखिते’ या पुस्तकात सायक्लोस्टाईल बुलेटिनचा वापर स्वातंत्र्य संग्रामात चंद्रपुरात झाल्याचा उल्लेख केला आहे.
इंग्लडचा राजकुमाराचा विरोध
इंग्लंडचे राजकुमार ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ हे भारत भेटीला आले होते. ३० जानेवारी १९२२ ला राजकुमार नागपूरला आले. देशभरात राजकुमाराचा भारत भेटीचा निषेध केला जात होता. अनेक शहरात बहिष्कार टाकला गेला. चंद्रपूर जिल्ह्यातूनही विरोध उमटला. चंद्रपूर, चिमूर, नागभिड, ब्रम्हपुरी, वरोरा येथे भेटी विरोधात बहिष्कार टाकला गेला.