कोरपना : तालुक्यात वाढत्या औद्योगिकरणामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम अलीकडे तालुकावासीयांना बरेच जाणवायला लागले. दम्यासारखे विकार अनेकांना जडले असून सद्यस्थितीत तालुक्यात असलेल्या वैद्यकीय सेवा कुचकामी ठरत आहेत. ५४ ग्रामपंचायती अन् ११३ गावे कोरपना तालुक्यात समाविष्ट आहेत. कोरपना व गडचांदूर येथे ग्रामीण रुग्णालय तर नारंडा, मांडवा आणि विरूर (गाडेगाव) येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या पाच ठिकाणाहून तालुकावासीयांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात येतात. तालुका स्थळी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि औषधांची नेहमीच वानवा राहते. आरोग्य केंद्रातही डॉक्टर असले तर, आरोग्य सेविका उपस्थित नसतात. अशा वेळी नाईलाजाने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक खेडेगावात वैद्यकीय सेवा कोसोदूर आहेत. गंभीर आजार उद्भवल्यास रुग्णांना मृत्यूला कवटाळावे लागते. अशी गंभीर स्थिती असताना उपलब्ध शासकीय वैद्यकीय सेवाबाबत तक्रारी वाढतच आहेत. ग्रामीण भागात शासनाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे निर्माण केले. काही निवडक ठिकाणी त्याद्वारे गोरगरीब जनतेला चांगली सेवा मिळतही आहे. मात्र अनेक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राबाबत समस्या व तक्रारींचा पाढा वाढत आहे. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बोगस प्रमाणपत्र मिळवून अथवा शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या रुग्णालयात कंपाऊडर म्हणून काम करून ग्रामीण भागात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकदाही अशा डॉक्टरांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची तपासणी झाली नाही. त्यामुळे आजघडीला नांदाफाटा, गडचांदूर, नारंडा, कोरपना, पिपर्डा, अंतरगाव, कढोली, सोनुर्ली, पारडी परिसरात पन्नासावर असे बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित जनता ‘देव म्हणजे डॉक्टर’ मानतात. परंतु काही डॉक्टर सध्या वैद्यकीय व्यवसाय सेवा म्हणून न करता तो ग्रामीण व शहरी भागात धंदा झाला आहे. त्यामुळे अधिक नफा मिळविण्याच्या नादाने काही डॉक्टर रुग्णांची लुबाडणूक करू लागले आहेत. ग्रामीण भागातील १0 वी, १२ वी किंवा पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणांना कंपाऊंडर म्हणून रुग्णालयात कामास ठेवायचे त्यानंतर ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करायला लावायचा आणि आपल्या रुग्णालयात पाठवायला लावायचे अशी साखळी बर्याच रुग्णालयात सुरू आहे. यातूनच ग्रामीण भागातील दुर्गम भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कोरपना तालुका बोगस डॉक्टरांच्या तावडीत
By admin | Published: May 12, 2014 11:28 PM