अमोद गौरकरशंकरपूर : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात असून मागील दोन दिवसांपासून मायनस पाच डिग्री सेल्सिअस थंडीमध्ये बिस्किटे खाऊन ते विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रात्र काढत आहेत. त्या बॉर्डरवर भारतीय दूतावासाचा कोणताही अधिकारी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वारंवार उडवाउडवीची उत्तरेच विद्यार्थ्यांना मिळत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर अधिकाऱ्यांशी बोलतानाचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओही लोकमतकडे उपलब्ध आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होत असल्याने व त्या शिक्षणाला भारतात मान्यता असल्याने हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात; परंतु यावर्षी रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात आहेत. रशिया युक्रेनवर बॉम्बचा हल्ला करीत आहे. अशा युद्धजन्य स्थितीत तेथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड या देशाच्या सीमेवर पाठविले जात आहे. या देशामध्ये जाण्यासाठी बरेच विद्यार्थी त्या मार्गाने गेले. या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी भारतीय दूतावासाने पांढऱ्या रंगाची बसही दिली; परंतु त्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे जवळपास ३५ ते ४० किलोमीटर विद्यार्थी पायी प्रवास करून पोलंड देशाच्या सीमेपर्यंत पोहोचले; परंतु युक्रेनच्या सीमा रक्षकांनी त्यांना पोलंडच्या सीमेवर जाण्यास बंदी घातली. जोपर्यंत भारतीय दूतावासाकडून विस्तृत माहिती अथवा परवानगी येत नाही, तोपर्यंत पोलंडमध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक दिवस आणि एक रात्र काढावी लागत आहे. तापमान कमी असल्याने त्रास अधिकरच वाढला आहे.
अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली - युक्रेनच्या बॉर्डरवर ज्या ठिकाणी विद्यार्थी अडकले आहेत, तिथे उणे पाच डिग्री तापमान आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीची भारतीय विद्यार्थ्यांना सवय नसल्याने त्यांची प्रकृती ढासळत आहे. तेथे कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी हतबल होत आहे. भारतीय विद्यार्थी एकमेकाला आधार देत असले तरी मनाने ते खचत आहेत.
मोबाईलचे चार्जिंगही संपले - विद्यार्थी उघड्यावरच राहत असल्याने त्यांच्या मोबाईलचे चार्जिंग होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद पडले आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांचा त्यांच्या मुलांशी संवाद होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक योजना तयार करून दहाजणांचा ग्रुप तयार केला आणि त्यात दहाजणांच्या ग्रुपमध्ये प्रत्येक दिवशी एकाजणाचा मोबाईल सुरू ठेवण्यात येत असून ते नंबर त्यांनी पालकांना दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कसाबसा तरी पालकांशी संपर्क होत आहे.
जवळचे खाद्यपदार्थही संपत आलेविद्यार्थ्यांजवळ असलेले बिस्कीटचे पाकीट व इतर खाद्य संपत आले आहे. तिथे पाण्याची कमतरता असून घोटभर पाण्यात ते आपली तहान भागवून दिवस पुढे ढकलत आहेत. अशा बिकट परिस्थितीत भारतीय विद्यार्थी त्या सीमेवर थांबून असल्याने इकडे पालकांना चिंता वाटू लागली आहे. जवळपास दोन हजार विद्यार्थी व लोक त्या सीमेवर अडकून असल्याची संपूर्ण माहिती तिथे असलेल्या ऐश्वर्या खोब्रागडे हिने आपल्या पालकांना दिली. तिचीही चिंता पाहून पालक प्रफुल्ल खोब्रागडे अतिशय चिंतेत आहेत.