चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराभोवती नवीन वस्त्या निर्माण झाल्या. चंद्रपूरचे आठ-नऊ प्रमुख मार्ग आहेत. यात महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर मार्ग, बाबूपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या मार्गांचा समावेश होतो. या प्रमुख मार्गांसह प्रभागात अनेक अंतर्गत रस्ते आहेत. चंद्रपूर मनपाला विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळतो. त्यामुळे बयाच रस्त्यांची कामे पूर्ण झाली. काही कामे प्रगतिपथावर आहेत. रामनगर, तुकूम मार्ग बाबूपेठ मार्गाला जोडणाया अंतर्गत मार्गावर खड्ड्यांची श्रृंखला दिसून येते. त्यातच अमृत नळ योजनेचे काम करण्यासाठी अंतर्गत रस्ते पोडण्यात आले. मात्र, दुरुस्ती विलंब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
रात्रीच्या सुमारास अपघाताची शक्यता
चंद्रपुरातील प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यावरून फेरफटका मारला असता गावखेड्यासारखे रस्ते दिसून आले. तुकूम, दे. गो. तुकूम, बाबूपेठ परिसर या भागातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळेत पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.