मुनगंटीवार यांचे आवाहन : पोंभूर्णा न. पं.च्या वैशिष्ट्यपूर्ण इमारतीचे भूमीपूजनपोंभुर्णा : पोंभुर्णा तालुका हा राज्यातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व समूह शेतीच्या प्रयोगातून आदर्श तालुका म्हणून पुढे आला पाहिजे. या योजनांसाठी आवश्यक निधी आणि तंत्रज्ञानाची व्यवस्था करून देऊ. शेतकरी आणि युवकांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मंगळवारी वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पोंभुर्णा नगरपंचायत इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ८ कोटी रुपयांच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. व्हाईट हाऊसच्या प्रतिकृतीसारखी ही इमारत वास्तुकलेचा उत्कृष्ट नमूना म्हणून या नव्या नगरपंचायतीसाठी उभी राहत आहे. सौर ऊर्जेवरील विद्युत यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टींग, अत्याधुनिक सभागृह व शहराला आकार देणारी व्यापार संकुलाची रचना यामध्ये समाविष्ट असून एका प्रेक्षागृहाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. वर्षभरात ही वास्तू साकारली जाणार आहे.भूमीपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, मुख्याधिकारी विपीन मुग्धा आणि पदाधिकारी उपस्थित होते. या वास्तूच्या भूमीपूजनासोबतच जानाळा-सुशी-पोंभूर्णा-रामा या ३६० किमी रस्त्याच्या २५ कोटी रूपये किमतीच्या सुधारणा कार्याचे भूमीपूजनही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. रस्ते, पाणी पुरवठा, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती इमारत, स्मशानभूमी अशा अनेक विकास कामांना वेळेच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व समूह शेतीसाठी पुढे यावे!
By admin | Published: March 30, 2017 12:44 AM