आमसभेतही निर्णय नाही : चंद्रपूरकर किती दिवस सहन करणार त्रासचंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून पाण्यासाठी चंद्रपुरात बोंब सुरू असतानाही आजपर्यंत पाण्याची वितरण व्यवस्था चांगली होऊ शकली नाही. भर पावसाळ्यात इरई धरण तुडुंब भरले असतानाही चंद्रपुरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, चंद्रपूरकरांना या संघर्षातून कोणताही नगरसेवक वा मनपा प्रशासन मुक्त करू शकले नाही. सोमवारी केवळ या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेत एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र त्यातही यावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. काही भागात पाणी पुरवठा होतो मात्र नळाला अतिशय कमी पाणी येते. यातून नागरिकांच्या गरजाही पूर्ण होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. (शहर प्रतिनिधी)पाईपलाईन तीच; कनेक्शन वाढलेपाण्याची टॉकी ते फिल्टर प्लॅन्टमध्ये असणारी पाईप लाईन मोठी असते. त्यानंतर मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी संबंधित प्रभागात पोहचते. त्यानंतर ३ ते ४ इंचांच्या पाईपमधून हे पाणी वितरित केले जाते. पूर्वी ५० कनेक्शनधारकांना ज्या पाईनलाईनवरून पाणी वितरित केले जाते, त्याच पाईनलाईनवर आता १०० ते २०० कनेक्शन आहेत. त्यामुळे पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नाही, अशीही माहिती आहे.
धरण हाऊसफुल्ल; मात्र शहरात पाण्याची बोंब !
By admin | Published: September 25, 2016 1:08 AM