नवरगाव : नवरगाव ते सिंदेवाही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक युवा ब्रिगेडच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजिनक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी घाले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.
नवरगाव ते सिंदेवाही मार्ग अरूंद आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोलगट भाग निर्माण झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन रस्त्याच्या कडेला मुरूम भरण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही. मंगळवार सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अधिकारी घाले यांनी भेट देवून दोन दिवसात रस्त्याची दुरुस्ती करुन रस्त्याच्या कडेला मुरुम टाकण्याचे आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष अमोल सेवादास निनावे, सदस्य प्रमोद बारसागडे, प्रणय गायकवाड, अर्चना कुंबरे, चक्रधर चावरे, गजानन गुरुनुले, बाळू लोखंडे, समीर बावणे, आदित्य धोंगडे, इरफान पठाण, बबन काळसर्पे आदी सहभागी झाले होते.