लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर व शिवणी मार्गावरील उमा नदीवर बंधारा बांधून पाणी अडविल्याने नदीतीले पाण्याचा मोठा साठा उपलब्ध झाला. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार नाही, अशी शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.उमा नदीवरून रत्नापूर गावासाठी नळयोजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शिवणी व काही प्रमाणात नवरगावला नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा होते. मात्र नदीचे पात्र दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडत असल्याने या तिन्ही गावांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. नवरगावला पाणी पुरवठ्यासाठी धुमणखेडा या ठिकाणी बोरवेल आहे. अलीकडे उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी या विहिरी सक्षम नाहीत. त्यामुळे सर्व भार हा नळ योजनेवरच अवलंबून आहे.दरवर्षी निर्माण होणारी पाण्याची समस्या लक्षात घेवून रत्नापूर ग्रामपंचायतने बंधारा बांधण्याची मागणी केली असता प्रशासनाने मान्यता दिली. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नदी पात्रात विहिरी बांधल्या आहेत. त्याच्या खालच्या भागाला नदी पात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला आहे.ग्रामपंचायतने त्याठिकाणी प्लेट लावून पाणी अडविले. त्यामुळे बंधाºयाच्या वरच्या भागाला नदीपात्रात चार-पाच किमी अंतरापर्यंत जलसाठा उपलब्ध झाला. रत्नापूरवासींना सदर पाणी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पुरवठा होऊ शकतो.बंधाºयामुळे उपलब्ध झालेले पाणी शेतकऱ्यांना वापरता येत नाही. परंतू याच नदी पात्राच्या दोन्ही भागाला काही प्रमाणात शेती आहे. काही शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. वीज पंपाच्या सहाय्याने नदी पात्रातील पाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. अशा शेतकºयांवर वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायत, वीज वितरण कंपणी तसेच तहसील कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने हा परिसर आता सौंदर्याने खुलून दिसत येत आहे. जंगलाचा परिसर लागून असल्याने वन्यप्राण्यांनाही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
बंधाऱ्यामुळे पाण्याची समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 6:00 AM