तीन प्रकल्पग्रस्त रुग्णालयात : नवव्या दिवशीही उपोषण सुरूचचंद्रपूर : पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवसांचा रोजगार, यासह अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सहायक कामगार आयुक्तांनी यावर तोडगा काढण्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलविली होती. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने बैठकीला दांडी मारली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यास व्यवस्थापन उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नवव्याही दिवशी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरूच आहे.कामगार आयुक्तांनी बुधवारी अप्पर सहायक कामगार आयुक्तांकडे तातडीची बैठक बोलविली आहे. दरम्यान, आज बुधवारी पुन्हा एक उपोषणकर्ता मारोती सोनेकर याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले अहे. गुप्ता एनर्जी कंपनीतील प्रकल्पग्रस्त कामगारांनी पाच महिन्यांचे थकीत वेतन, २६ दिवस रोजगार आणि वेळेवर वेतन या मागण्यांसाठी २२ मार्चपासून उपोषण सुरू केले. याआधीही प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कामगार व कंपनी व्यवस्थापनाची बैठक झाली. त्यात मागण्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आश्वासन फोल ठरले. उपोषणादरम्यान चंद्रप्रकाश सिरसिला आणि प्रशांत कुळमेथे यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)प्रशासनाचे आश्वासन फोलमागील बैठकीत प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण मागे घेतले. मात्र, महिना लोटूनही कंपनी व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविल्या नाही. प्रशासनाचेही आश्वासनही फोल ठरले.
कंपनी व्यवस्थापनाची बैठकीला दांडी
By admin | Published: March 30, 2017 12:51 AM