कोरोना संसर्गामुळे प्रत्येकाने आरोग्यविषयक काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. पावसाच्या दिवसांमध्ये कानांना बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक असतो. कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक वर्षीच अनेकांना हा आजार जडतो. मात्र आता कोरोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती व्यक्त केली जात आहे. बुरशी, बॅक्टेरियाचा आजार पावसाळ्यात होतो. ज्यांच्या कानाचा पडदा फाटला आहे, ज्यांना कानाला पूर्वीपासूनच इन्फेक्शन आहे, अशा नागरिकांमध्ये बुरशी वाढण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या नागरिकांमध्ये हा आजार होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. कान दुखत असल्यास रुग्णांनी घरगुती उपचार न करता तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
बाॅक्स
काय घ्याल काळजी?
कान नेहमी कोरडा ठेवा. अंघोळ झाल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान तातडीने कोरडे करावेत. हेडफोन वापरत असाल तर वारंवार हेडफोनचे निर्जंतुकीकरण करा. टोकदार वस्तूने कान साफ करू नये. कान दुखल्यास तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावा. कानात काडी टाकू नये, तेल टाकणे धोकादायक आहे. स्परस्पर कोणतेही ड्राॅप्स कानात टाकू नयेत. कानाचा पडदा नाजूक असतो. त्यामुळे तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा.
बाक्स
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
पावसाच्या दिवसांमध्ये वातावरणामध्ये आर्द्रता अधिक असते. त्यामुळे कानात बुरशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर कान नीट स्वच्छ न करणे, कानात काडी टाकण्याच्या प्रकारामुळे बुरशी होऊ शकते. ज्यांचे कानाचे पडदे फाटलेले आहेत, त्यांना धोका अधिक असतो. कान दुखत असल्यास घरगुती उपचार करू नयेत. कानात टोकदार वस्तू, काडी घातल्याने जखम होण्याची शक्यता असते.
कोट
पावसाच्या दिवसांमध्ये कानात पाणी जाऊ देऊ नये, कान कोरडा ठेवावा, कानात तेल टाकू नये. विशेषत: लहान बालकांच्या कानामध्ये काहीजण आईचे दूध टाकतात. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून बुरशीचा आजार होऊ शकतो. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच कानाचा औषधोपचार करावा.
- डाॅ. मनीष मुंधडा
कान, नाक, घसा तज्ज्ञ, चंद्रपूर