गोंडपिंपरी : सध्या शेतीचा खरीप हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे. अशातच बळीराजा पूर्ण उत्साहाने शेतीकामात मग्न झाला असताना पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांवर रोगराईचे संकट ओढवले. यावर उपाययोजना म्हणून पिकांवर फवारणी करण्यासाठी शेत मालकाकडून शेतमजुरांना रोजंदारीवर फवारणी कामी लावण्यात येत आहे. मात्र शेत मालकाकडून शेतमजुरांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा किट देण्यात येत नसल्यामुळे जिवावर उदार होऊन शेतमजूर विषारी औषधांची फवारणी करत असून, शेत मालकाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्हा सीमेवर वसलेले गोंडपिपरी तालुक्यात औद्योगिकरणाच्या अभावामुळे तसेच शासनाच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यात उद्योग निर्मिती करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील ८० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती व्यवसाय असून, यावरच तालुक्याची अर्थव्यवस्था विसंबून आहे. अशातच सध्या शेती व्यवसायाचा खरीप हंगाम सुरू असून, शेतमालक व शेतमजूर जोमाने कामाला लागले आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने तालुक्यातील कोरडवाहू पिकांमधील कापूस पीक तसेच ओलिताखाली शेतीमधील धान पीक यावर विविध रोगाने हल्ला चढविला आहे. यामुळे शेत मालकांनी शेतमजुरांचा शोध घेत फवारणी उपाय राबविण्यासाठी रोजंदारीवर मजूर ठेवले. मात्र विषारी रासायनिक औषधे असलेल्या द्रव फवारणीसाठी शेतमजुरांना कुठल्याही सुरक्षा कवच किंवा किट न देता फवारणी करण्यास कामाला लावण्यात येत असून, फवारणी काम करणाऱ्या मजुराला याचे दुष्परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. अशा असुरक्षित कामामुळे चक्क जिवावर उदार होऊन काम करावे लागत आहे. शेतमालकांनी शेतमजुरांच्या जीवनाबाबत गंभीरता दर्शवून फवारणी काम करताना सुरक्षा किट प्रदान करूनच फवारणी करून घ्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.
120821\images (5).jpeg
सुरक्षा किट वीना फवारणी करताना शेतमजूर