संजय अगडेलोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा : नागभीड तालुक्यात येत असलेल्या सोनापूर गावालगत असलेल्या घोडाझरी नहरावरील कुलाबा गेट व पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. यामुळे एखाद्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सोनापूरचे उपसरपंच महेश फटिंग व गावकरी वर्गाच्या वतीने पत्रकार परिषदेत केला आहे.ब्रिटिशकालीन घोडाझरीचा मुख्य कालव्यावरील कुलाबा गेट हा जीर्ण झाला असल्यामुळे खचून गेलेला आहे. गावाच्या मधोमध ब्रिटिश सरकारने सोनापूर येथील शेतकऱ्यांना पाण्याची अडचण लक्षात ठेवून गेटवर पाणी चढवण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. या मध्यभागावरून गावातील नागरिक नेहमी ये-जा करीत आहे. या पुलावरून जीव मुठीत ठेवून मार्गाक्रमण करावे लागते आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोजणीही केली. कामाला मंजुरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते. मात्र दोन वर्षांपासून याबाबत कुठलाच निर्णय झाला नाही. १० मार्चपर्यत नवीन पूल मंजूर न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सरपंच शीला श्रावण ठोंबरे, उपसरपंच महेश धर्मराव फटिंग, सदस्य सविता कुंभरे, सिंधू सेलोकर, ज्योत्स्ना दडमल, अमोल पत्रू श्रीरामे, भुरू हजारे उपस्थित होते.